नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. मराठावाडा विभागातील २४ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा, अशोक चव्हाण यांनी आज घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

संथ गतीने सुरू असलेल्या कामांविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशारा चव्हाण यांनी कंत्राटदारांना यावेळी दिला.रस्त्यांची कामे करताना भूसंपादन, वन विभागाचे परवाने यासह इतर अडचणी लवकरात लवकर सोडवाव्यात प्रसंगी यासाठी राज्यस्तरावर महसूल विभागाबरोबर बैठक घ्यावी, तसेच अशा अडचणी येऊ नयेत, यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, रस्त्यांच्या कामांना नागरिकांचा विरोध का होतो याचा अभ्यास करण्यासाठी अभियंत्यांची नियुक्ती करून अहवाल सादर करावा.

त्याचप्रमाणे रस्त्यांच्या बाजूला असलेल्या जमिनींचं सीमांकन करण्यासाठी आणि त्याची नोंदणी महसूल विभागात करण्यासंदर्भात यंत्रणा विकसित करावी, अशा सूचनाही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.