नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं कृषी क्षेत्र, आपले शेतकरी, आपली गावं, हाच आत्मनिर्भर भारताचा आधार आहेत. ते मजबूत असतील तरच आत्मनिर्भर भारताचा पाया मजबूत होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या “मन की बात” या कार्यक्रमातून देशातल्या जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ज्याची मुळं जमिनीशी जोडलेली असतात, ते मोठ-मोठ्या वादळातही ठामपणे उभे राहू शकतात. कोरोनाच्या कठीण काळात कृषिक्षेत्रानं, शेतकऱ्यांनी याचं उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवलं, अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी संकटाच्या काळातही कृषी क्षेत्रानं केलेल्या उत्तम कामगिरीचं मन की बात मधून कौतुक केलं. २०१४ साली फळं आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या कक्षेतून मुक्त केल्यानं, शेतकऱ्यांना त्यांचा माल इतरत्र मुक्तपणे आणि वाजवी किमतीत विकता आला असं त्यांनी सांगितलं.

या निर्णयाचा लाभ घेत देशभरातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी संघटितपणे आपला कृषी माल विकण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांची उदाहरणंही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधे मांडली. असाच प्रयत्न केलेल्या राज्यातल्या श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, या शेतकरी समुहाचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला. या कंपनीचे एक संचालक ऋतुराज जाधव यांनी याबाबत आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या काळात शेती करताना, जितक्या आधुनिक पर्यायांचा वापर करू, तितकीच शेती प्रगत होईल, असा सल्लाही प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांना दिला.

आजच्या “मन की बात”मध्ये प्रधानमंत्र्यांनी गोष्टी सांगण्याच्या माध्यमातून होणाऱ्या संस्कारांचं महत्व विषद केलं. कोरोनाच्या या संकटकाळानं कौटुंबिक नाती अधिक घट्ट केल्याचं ते म्हणाले. आजी आजोबांच्या गोष्टींची पारंपरा खंडित झालेल्या घरांतल्या माणसांना, कोरोनाच्या काळात सक्तीनं एकत्र राहावं लागल्यावर परिस्थितीशी जुळवून घेणं कठीण गेल्याची जाणीव त्यांनी करून दिली. हितोपदेश आणि पंचतंत्राचा उल्लेख करत भारताच्या विविध भागातील कथाकथनाच्या परंपरांचा आलेखही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून मांडला. आजच्या नव माध्यमांतून, देशभरात कथाकथनाची परंपरा रुजवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या अनेक व्यक्तींचाही त्यांनी उल्लेख केला. यात त्यांनी पुण्यातल्या वैशाली व्यवहारे-देशपांडे करत असलेल्या प्रयत्नांचाही आवर्जून उल्लेख केला.

उद्या २८ सप्टेंबरला शहीद वीर भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. आपण भगतसिंग यांच्यासारखे होऊ किंवा नाही. मात्र भगतसिंग यांच्यासारखंच देशप्रेम, देशासाठी काही करण्याची इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयात असली पाहिजे. तीच शहीद भगतसिंग यांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

२ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि माजी प्रधानमंत्री दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. त्यानिमित्तानं आजच्या मन की बात मधून देशाच्या या महान नेत्यांचं महात्म्य त्यांनी विषद केलं. महात्मा गांधीजींचे आर्थिक विचार समजून घेतले असते, त्यांचा गाभा जाणून घेतला असता, त्यांनी दाखवलेला मार्ग स्वीकारला असता तर आज आत्मनिर्भर भारत अभियानाची गरज भासली नसती असं ते म्हणाले. शास्त्रीजींचं आयुष्य आपल्याला विनम्रपणा आणि साधेपणाचा संदेश देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

११ ऑक्टोबरला भारतरत्न लोकनायक जयप्रकाशजी यांची, तसंच भारतरत्न नानाजी देशमुख यांची जयंती आहे. त्यानिमीत्तानं मोदी यांनी त्यांच्या कार्यालाही उजाळा दिला. आपलं अवघे आयुष्य लोकांच्या सेवेत समर्पित करणाऱ्या राजमाता विजयाराजे सिंधिया यांची १२ ऑक्टोबरला जयंती असल्याचं सांगून, मोदी यांनी त्यांच्यासोबत काम करत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. देशासाठी आपलं सर्वस्व त्यागणाऱ्या अशा महान नेत्यांना अभिमान वाटेल अशा भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्याचं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून केलं.

कोरोनाविरुद्धचा लढा अजूनही संपलेला नसल्यानं मास्क वापरणं, परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं या नियमांचं पालन करत राहण्याचं आवाहनही मोदी यांनी आजच्या मन की बातमधून केलं.