मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून यावर्षी कुणकेश्वर, मालवण, वेंगुर्ले आणि  सावंतवाडी इथं  पर्यटन महोत्सव आयोजित केला जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी  काल सिंधुदुर्ग इथं बातमीदारांना ही माहिती दिली. पुढच्या वर्षांपासून जिल्हास्तरावर मोठ्या स्वरूपाचा ‘सिंधू महोत्सव’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नसल्याचं आरोग्य यंत्रणेचे मत असल्याचं त्यांनी सांगितलं. उदय सामंत हे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात  बैठक घेऊन कोविड, क्रीडा, नरडवे प्रकल्प, रमाई आवास योजना आदींबाबत आढावा घेतला.