मुंबई (वृत्तसंस्था) : कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचं आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर इथली स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर द्यायला समर्थ आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होतं, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग – गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्रानं स्वतःला आघाडीवर ठेवलं. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्रानं उचललेल्या ठोस पावलांचं देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झालं. छत्रपती शिवराय, ताराराणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत.या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातल्या प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले, असं नाही. महाराष्ट्रानं पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचंही लक्ष वेधलं आहे. आरोग्याची पुढच्या काळातली आव्हानं लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचं नियोजन केलं आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचं कर्तव्य आम्हाला पार पाडायचं आहे आणि पार पाडतही आहोत.

मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजवण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष आणि संघटनांसह सर्वांना केलं आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यातल्या जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देत, राज्यातल्या जनतेच्या एकजूट आणि निर्धाराच्या बळावर महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल अखंड सुरु राहील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचं स्मरण करुन त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे, तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातल्या शहीद वीरांना आदरांजली वाहिली आहे.