मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांवरचे भोंगे खाली आणायला हवे, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित मुद्दा निकाली काढण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे, मात्र त्याला धार्मिक रंग देणार असाल, तर उत्तरही धार्मिक पद्धतीनेच दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला. उद्यापर्यंत जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही, तर चार तारखेपासून सगळ्या मशिदींसमोर हनुमान चालिसा वाजवण्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीय द्वेषाचं राजकारण सुरू झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. महापुरुषांचे विचार समजून न घेता, फक्त जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यावर भर दिला जात असल्याबद्दल ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल होते, मात्र मशीद पाडल्याचं श्रेय फक्त कारसेवकांचं आहे, असं भाजप नेते तथा विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत जाहीर सभेत बोलत होते. हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यावरून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्याबद्दल, फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वीजभारनियमासह अनेक मुद्यावरून टीका करतानाच, १४ तारखेनंतर पोलखोल सभा घेणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.