मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मुंबई महापालिका आणखी चार लसी उपलब्ध करणार असून त्यासाठी ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यामुळे लवकरच फायझर, स्फुटनिक, जॉन्सन आणि मॅार्डना या लशींचे ५० लाख डोस उपलब्ध होणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी काल दिली.
मुंबईत लसींची पुरेशी उपलब्धता होण्याच्या दृष्टीनं जागतिक पातळीवरुन लस खरेदी करण्याच्या अनुषंगानं शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या असल्याचं मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कालच सांगितलं होतं.
मुंबईत लसीकरण केंद्रं वाढवण्याचे प्रयत्न सतत चालू आहेत. प्रत्येक पालिका झोनमध्ये एक ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र सुरु करण्याचं काम चालू आहे. गृहनिर्माण संस्था आणि रुग्णालयांच्या सहभागातून निवासी संकुलामध्ये लसीकरण राबवण्यासाठी सूचनाही काल पालिकेनं जारी केल्या आहेत, अशी माहितीही ठाकरे यांनी दिली.
पालिकेनं ग्लोबल टेंडर मागवून लस विकत घ्याव्यात आणि मुंबईकरांना मोफत लस द्यावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी काल च पालिका आयुक्तांकडे केली होती. त्यावर आयुक्तांनी ग्लोबल टेंडर काढण्याचं आश्वासन दिल्याची माहिती दरेकर यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
मुंबईमध्ये लसीचा तुटवडा सुरु आहे, नागरिकांना लस मिळत नाही, हे सर्व पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे होत आहे, अशी टीका दरेकर यांनी केली.