नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अंमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे प्रारूप देशपातळीवर राबवण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केले आहे. या वेळी पुण्याने राबवलेल्या प्ररुपाचेही कौतुक करण्यात आले.

मुंबईतल्या २४ विभागांसाठी प्रत्येकी २४ नियंत्रण कक्ष स्थापन केले गेले. रुग्णांच्या चाचणीचे अहवाल संबंधित विभागात पाठवले जातात. प्रत्येक नियंत्रण कक्षात ३० टेलिफोन, त्यासाठी स्वतंत्र ऑपरेटर्स. प्रत्येक विभागात १० डॉक्टर आणि १० रुग्णवाहिकांची सोय केली आहे. त्यामुळे रुग्ण वाढ आटोक्यात राहिली, असे निरीक्षणही केंद्रीय आरोग्य विभागाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी नोंदवले.

पुण्यानेही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचेही आरोग्य मंत्रालयाने कौतुक केले आहे. पुण्याने विशेष प्रयत्न करुन रुग्ण बाधितांचे प्रमाण ६९ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांरून ४१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांवर आणल्यामुळे पुण्याच्या प्ररुपाचे विशेष कौतुक केले गेले.