नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा, येत्या १६ मे पर्यंत चक्रीवादळात परावर्तीत होऊ शकतो, असा इशारा देशाच्या हवामान विभागानं दिला आहे. यामुळे गोवा आणि दक्षिण कोकण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. अग्नेय अरबी समुद्र आणि त्याच्या आसपासच्या लक्षद्वीपच्या परिसरात हा पट्टा निर्माण झाला आहे.
उद्या सकाळपर्यंत संपूर्ण लक्षद्वीप परिसर या पट्ट्याखाली व्यापून जाऊ शकतो, त्यानंतर शनिवारपर्यंत दाब वाढून, पुढच्या २४ तासात याचं चक्रीवादळात रुपांतर होऊ शकतं अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या वादळाची तीव्रता वाढून ते वायव्य गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीच्या दिशेनं सरकेल, आणि १८ मे च्या संध्याकाळी गुजरात किनारपट्टीला धडकेल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
या वादळामुळे दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर रविवारी आणि सोमवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे.