नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ या आजारामुळे सुरु असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या नागरिकांना समाजमाध्यमावरून संबोधित केले. संचारबंदीच्या या काळात शिवभोजन केंद्रांमधून दिल्या जाणाऱ्या थाळ्यांचं उद्दिष्ट १ लाखांपर्यंत वाढवत असल्याची घोषणा त्यांनी केली.
गरीब आणि गरजूंनी गर्दी न करता याचा लाभ घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. सर्व जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यादृष्टीनं किरकोळ पुरवठादार आणि घराघरात वस्तुंचा पुरवठा करणाऱ्यांची साखळी सुरळीत सुरु राहावी यासाठी पोलीस, महसूल, सहकार, पणन आणि कामगार विभागाला सूचना दिल्या आहेत. शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचीही कुचंबणा होऊ नये यासाठी ग्रामीण भागातून पुरेसं दूध संकलन होईल याची खबरदारी घेण्याचे निर्देशही दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून लोकांची वाहतूक करण्याच्या प्रकारांमुळे दुर्दैवी घटनाही घडू शकतात, त्यामुळे अशा प्रकारची वाहतूक होणार नाही याची पोलीसांनी दक्षता घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्यायला साखर कारखान्यांना सांगितलं असल्याचं ते म्हणाले. परराज्यातून रोजगारासाठी आपल्या राज्यात आलेल्या श्रमिकांची प्रशासन काळजी घेईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
या काळात खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवला हवेत, रक्तसाठ्याचा तुटवडा भासु नये यासाठी स्वयंसेवी संस्थांनी सुरक्षित पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी शिर्डी संस्थानानं ५१ कोटी रुपये, तर सिद्धी विनायक ट्रस्टनं ५ कोटी रुपयांचा मदत निधी देऊ केला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
संचारबंदीच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाहीत, याची जबाबदारी नागरिकांनी घ्यावी, पोलीसांनीही नागरिकांना सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.