नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोनाबाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांना ते बरे झाल्यापासून किमान तीन महिन्यांनंतरच लसीची पहिली मात्रा दिली जाऊ शकते असं या सूचनांमधे म्हटलं आहे.
लसीची पहिली मात्रा घेतलेल्यांपैकी ज्यांना दुसरी मात्रा घेण्याआधीच कोरोनाची लागण झाली आहे, अशा व्यक्तींनाही ते कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनीच लसीची दुसरी मात्रा घेता येईल असं या सूचनांमधे म्हटलं आहे. याशिवाय ज्या व्यक्तींना इतर कोणत्याही आजारामुळे रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं किंवा अतिदक्षता विभागात उपाचर घ्यावे लागू शकतात किंवा घेतले असतील अशांनीही ४ ते ८ आठवड्यानंतरच लस घ्यावी असं या सूचनांमधे म्हटलं आहे.
लसीकरण करण्यापूर्वी व्यक्तीची कोरोना चाचणी करणं गरजेचं नाही, लस घेतलेली किंवा कोरोनातून बरी झालेली व्यक्ती १४ दिवसांनंतर रक्तदान करू शकते, स्तनदा माताही लस घेऊ शकतात असं या सूचनांमधे म्हटलं आहे.
या सूचनांदर्भातला आदेश केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे.