नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील सर्व प्रौढ लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येईल, असं केंद्रिय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं. भविष्यात विषाणुचं उत्परिवर्तन आणि मुलांना असलेले धोके लक्षात घेऊन देशात आरोग्य विषयक सुविधाचा दर्जा वाढवण्यात येत आहे, असंही ते म्हणाले.
देशात ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत २१६ कोटी लसीचे डोस उपलब्ध केले जातील. जुलैच्या अखेरीपर्यंत ५१ कोटी डोस उपलब्ध होतील. आरोग्यमंत्र्यांनी कोविड-१९ ला सार्वजनिक आरोग्य यंत्रणा देत असलेल्या प्रतिसादाचा आणि छत्तीसगढ, गोवा, हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी, अंदमान आणि निकोबार बेटं, चंदीगढ, दादरा आणि नगरहवेली, दमण आणि दीव, लडाख आणि लक्षदीप इथल्या लसीकरणाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना ब्लॅक फंगस किंवा म्युकरमायकोसिस रोगाला साथीचा रोग म्हणून अधिसूचित करण्याचे निर्देश दिले आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसंच सर्व प्रकरणांची नोंद ठेवली जाईल, याची खात्री करण्यासही सांगितलं आहे