नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यास चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकले असून धमरा ते बालेश्वर दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आहे. बालासोडच्या दक्षिणेकडे सरकताना त्याचे अतितीव्र चक्रीवादळामध्ये त्याचे रुपांतर होण्याची शक्यता असून उद्या सकाळपर्यंत ते झारखंडच्या दिशेने सरकण्याची अपेक्षा आहे. सध्या या वादळाची गती 135 किलोमीटर प्रतितास असून त्याची गती 155 किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता आहे. तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे.

दरम्यान ओडीशात तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाउस पडेल असं भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. तर पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंडमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचंही मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. दरम्यान पाच लाख 80 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असल्याची माहिती ओडिशाचे विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रदीप कुमार जेना यांनी दिली आहे.