नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. आतापर्यंत या महिन्यात 14 वेळा आणि या वर्षी 40 वेळा किंमती वाढवल्या असून देशभरातील वेगवेगळ्या राज्यात व्हॅटच्या दरानुसार पेट्रोल आणि डिझेल दर प्रति लिटर 18 ते 31 पैश्यांनी वाढले आहेत. आजच्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 24 पैशांनी वाढून 93 पूर्णांक 68 रुपये प्रतिलिटर झाली आहे तर डिझेलची किंमत 29 पैशांनी वाढून 84 पूर्णांक 61 पैसे झाली आहे.
मुंबईमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरच्या जवळ पोहोचलं असून 99 पूर्णांक 94 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे तर डिझेल 91 पूर्णांक 87 रुपये प्रतिलिटरवर आलं आहे. आपलं जमा झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर दीड ते दोन रुपयांची आणखी वाढ होऊ शकते असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात लवकरच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या नाहीत तर आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशातील ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलची भारी किंमत मोजावी लागणार आहे.