नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 या विषाणूचा संसर्ग चीनमधील वुहान इथं सुरू झाला. एखादा प्राणी या संसर्गाचा मूळ स्त्रोत आहे का किंवा संशोधन प्रयोगशाळेच्या अपघातामुळे हा विषाणू चीनमध्ये पसरला याचा तपास करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेला 3 महिन्यांचा कालावधी दिला आहे. मागील वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना साथीशी लढत असून अमेरिकेत आतापर्यंत 4 पूर्णांक 4 दशलक्षांहून अधिक नागरिक या आजारामुळे दगावले आहेत.
या आजाराचा नेमका स्त्रोत शोधण्यासाठी गुप्तहेर संस्थेच्या 2 वेगळ्या तुकड्या संभाव्य स्त्रोतानुसार विभागल्या असून गुप्तहेर संस्थेचे हे प्रयत्न नेमक्या निष्कर्षापर्यंत पोहोचवतील असं व्हाईट हाऊसनं काल जाहीर केलेल्या निवेदनात बायडन यांनी सांगितलं. बायडन यांच्या या वक्तव्यामुळे हा विषाणू प्रथम कसा निर्माण झाला या विषयीच्या वादात आणखी वाढ झाली आहे.
हे उत्तर सापडलं तर त्याचे चीनवर भरीव परिणाम होतील कारण या महामारीला आपण जबाबदार नसल्याचं चीननं म्हटलं आहे. आणि अमेरिकी रिपब्लिकन सदस्यांनी प्रयोगशाळेतून या विषाणूचा जन्म झाल्याचं कारण पुढे करुन चीनवर सतत दबाव ठेवला या दृष्टिनं अमेरिकी राजकारणाकरिता हा मुद्दा महत्वाचा आहे.