नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चक्रीवादळग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आज ओदिशाची राजधानी भुवनेश्वर इथं दाखल झाले. ओदिशाचे मुख्यमत्री नवीन पटनायक आणि केंद्रिय मत्री प्रतापचंद्र सारंगी यावेळी विमानतळावर उपस्थित होते. यास चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आढावा घेणार आहेत. या दोन्ही राज्यांमधल्या नुकसानग्रस्त भागांमध्ये सध्या वेगानं मदतकार्य सुरू आहे. मोदी आधी बालासोर, भद्रक आणि पूर्व मिदनापूर या जिल्ह्यांची पाहणी करतिल नंतर भुवनेश्वर आणि पश्चिम मिदनापूर इथं आढावा बैठका घेणार आहेत.

पश्चिम मिदनापूर इथल्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित असतील. यास चक्रीवादळामुळं राज्यांचं सुमारे 15 हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं असल्याचा प्राथमिक अंदाज पश्चिम बंगाल सरकारनं व्यक्त केला आहे. केंद्रानं आतापर्यंत 400 कोटी रुपयांची मदत जाहीर केली असून राज्य सरकारही एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर करणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. ओडिशामध्येही मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी काल नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.