नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामरीच्या पार्श्वभूमीवर CBSE आणि ICSE च्या १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याचे निर्देश मागणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली आहे. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर एकच वस्तुनिष्ठ स्वरुपाची परीक्षा घेतली जावी, आणि तिचा निकाल निर्धारित वेळेत जाहीर करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी याचिका सुनावणीसाठी दाखल करुन घेतली आणि पुढची तारीख ३१ मे दिली आहे. दरम्यान १२ वीच्या परीक्षेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने सर्व राज्यांकडून सूचना मागवल्या होत्या.

२५ मे पर्यंत राज्यांनी आपापलं म्हणणं केंद्रसरकारला कळवलं असून अंतिम निर्णय येत्या १ जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे.