नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशासमोर कितीही मोठं आव्हान आलं तरी देशाची सामूहिक शक्ती, आपल्याकडची सेवा भावना यामुळे देश प्रत्येक वादळातून बाहेर पडला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. आजच्या ‘मन की बात’मधे त्यांनी, कोरोना संकटाच्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा करणारे टँकरचे चालक, रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस चालवणाऱ्या महिला रेल्वे पायलट, हवाई मार्गानं ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या कामात गुंतलेले हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना चाचण्यांसाठीचे नमुने गोळा करण्याच्या कामात गुंतलेले लॅब टेक्नीशियन या क्षेत्रातल्या प्रतिनिधींशी संवाद साधून, त्यांचं कामाचं महत्व आणि त्यातली जोखीम जनतेसमोर मांडली. अशाप्रकारची जबाबादारी अंगावर असलेले लाखो कोरोना योद्धे बजावत असलेल्या कामगिरीमुळेच, देश कोरोनाच्या संकटाचा यशस्वीपणे सामना करु शकत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या कोरोनायोद्ध्यांना आपणही त्यांच्यासारख्याच परिश्रम आणि समर्पण वृत्तीनं सहकार्य केलं तर कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यात मोठी मदत होईल असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी कोरोनाचं संकट सुरु झाल्यापासून होत असलेल्या चाचण्या, ते ऑक्सिजन निर्मितीत आपल्याकडे असलेली कमतरता आणि त्यात उत्तरोत्तर साधलेल्या प्रगतीचा आढावाही घेतला. कोरोनाच्या संकटातही कृषी क्षेत्रानं साधलेली प्रगती आणि त्यासाठी केंद्र सरकारनं उत्पादन, खरेदी आणि विपणनाच्या बाबतीत राबवलेल्या विविध उपाययोजनांचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. अन्नधान्याच्या विक्रमी उत्पादनामुळे देश प्रत्येक नागरिकाला आधार द्यायला सक्षम असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच सध्याच्या संकटकाळात ८० कोटी गरीब लोकांना मोफत शिधावाटप केलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आजच्या ‘मन की बात’ मधून प्रधानमंत्र्यांनी, कोरोना संकटासोबतच अलिकडेच आलेल्या चक्रीवादळांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचाही उल्लेख केला. अशा कठीण परिस्थितीतही चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या सर्व राज्यं आणि तिथल्या लोकांनी धाडसानं या आपत्तींचा सामना केल्याबद्दल, त्यांनी कौतुक केलं. अवघा देश या संकटाशी संपूर्ण ताकदीनिशी झुंजल्यानंच आपण कमीतकमी जीवितहानी सुनिश्चित केल्याचंही नमूद केलं.