मुंबई: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी मंत्री सचिन अहिर, महापालिका उपायुक्त विजय बालमवार, सहायक आयुक्त शरद उघाडे आदी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण वॉर्डमार्फत याठिकाणी एक हजार स्थानिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्राचा शुभारंभ
वरळी परिसरातील कचरा वर्गीकरण आणि प्रक्रिया केंद्राचा प्रारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्त्री मुक्ती संघटनेमार्फत हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्थानिक कचरा वेचकांना यामध्ये सामावून घेण्यात आले असून असे आणखी दोन केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.