नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रदूषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी जैवइंधनाचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत आहे. त्यादृष्टीनं इथेनॉलमिश्रीत इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

इथेनॉल हा २१ व्या शतकातील भारताचा प्राधान्याचा विषय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त, पर्यावरण, वनं आणि हवामान बदल  विभाग तसंच पेट्रोल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दूरदृश्य प्रणालीद्वारे संयुक्तपणे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  ते बोलत होते.

या कार्यक्रमात सन २०२० ते २०२५ या कालावधीत देशातलं इथेनॉल उत्पादन आणि वापर वाढविण्यासंबंधीचा आराखडाही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. देशातले शेतकरी अधिकाधिक प्रमाणात जैवइंधनाशी संबंधित व्यवस्थेशी जोडले जात आहेत.

इथेनॉल निर्मिती आणि वापराला चालना मिळाल्याने शेतकऱ्यांना विशेषतः ऊस उत्पादकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल असं पंतप्रधानांनी नमूद केलं. याआधी केवळ जास्त ऊस उत्पादन आणि साखर कारखाने असलेल्या मोजक्या ठिकाणीच इथेनॉल उत्पादन केलं जात होतं.

मात्र आता इथेनॉलच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा संपूर्ण देशभर उभारण्यात येत आहेत. २०१४ मध्ये देशात इथेनॉलमिश्रित इंधनाच्या वापराचं प्रमाण केवळ एक ते दीड टक्का इतकं होतं.

आता त्यामध्ये वाढ होऊन ते साडेआठ टक्क्यांवर गेलं आहे, असंही ते म्हणाले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या विविध भागांतल्या  जैवशेती करणाऱ्या तसंच इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर करणाऱ्या काही शेतकऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून थेट संवादही साधला.

पुणे जिल्ह्यातल्या बाळू नथू वाघमारे या शेतकऱ्याचा त्यामध्ये समावेश होता. याच कार्यक्रमात पंतप्रधानांनी पुण्यातील तीन ई-१०० वितरण स्थानकांच्या प्रायोगिक प्रकल्पाचं उद्घाटनही केलं.

केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी, प्रकाश जावडेकर, नरेंद्रसिंह तोमर यांच्यासह पुण्याचे महपौर मुरलीधर मोहोळ हे देखील या कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.