मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली कोविड स्थिती आणि उद्यापासून निर्बंधांमध्ये येणारी शिथिलता या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या प्रमुख उद्योजकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली.

राज्यात अनलॉक करताना विचारपूर्वक जोखीम घेण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा निर्बंध नको असतील कोरोना प्रतिबंधक खबरदारीचे उपायांच्या पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

यावेळी कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेत महाराष्ट्रानं उद्योग चालवून दाखवले असं उदाहरण देशात प्रस्थपित करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्याला लॉकडाऊन आणि नॉकडाऊन दोन्ही नकोत आहेत, आरोग्याचे नियम पाळत आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

उद्योगांनी बांधकाम कामगार तसंच बाहेरच्या राज्यातून आलेल्या कामगारांच्या नोंदी ठेवाव्यात, येणाऱ्या काळात कोरोनाची तिसरी लाट आली आणि लॉकडाऊन करावा लागला तर आपल्या दैनंदिन कामकाजावर, उत्पादनावर परिणाम होणार नाही अशी व्यवस्था उद्योगांनी उभारावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

यावेळी उद्योजकांनी आपल्या मागण्या मुखमंत्र्यांसमोर मांडल्या, सरकारनं लसीकरणाचा वेग वाढवावा, निर्बंधांच्या बाबतीत अगदी लहान लहान कंटेनमेंट झोन्सवर भर द्यावा अशा काही सूचनाही केल्या.