मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यानं राज्यातल्या अनेक भागात उद्यापासून निर्बंध कमी व्हायला सुरुवात होणार आहे.
राज्य सरकारच्या दिशानिर्देशांनुसार ठाणे, नवीमुंबई या शहरांचा दुसऱ्या स्तरात समावेश आहे. तर उर्वरीत जिल्ह्यात मिरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुर, शहापुर, मुरबाड या शहरांचा स्तर तिसरा ठेवला आहे. त्यानुसार उद्यापासून दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तरातील निर्बंध काही अंशी शिथील होणार आहेत.
नियम पाळले नाही तर मात्र पुन्हा कडक निर्बंध लावले जातील असंही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
नाशिक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं उद्यापासून अनेक निर्बंध शिथिल केल्याची अधिसूचना नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी आज जारी केली आहे.
दररोज पहाटे पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी लागू राहील आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर पहाटेपर्यंत संचारबंदी लागू केल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे.
नांदेड जिल्ह्यातही निवडक सेवा, आस्थापना आणि उपक्रमांना मर्यादेत सुट देण्याचा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला आहे. उद्यापासून शासनाच्या पुढच्या आदेशापर्यंत हे आदेश निर्गमित केले आहेत.
परभणी जिल्हा प्रशासनानं उद्यापासून पुढील आदेश येईपर्यंत जिल्ह्यातल्या सर्व बाजारपेठांमध्ये संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठा पूर्णतः बंद राहतील असं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितलं आहे.
गडचिरोलीत उद्यापासून सर्व दुकानं ७ ते ४ वाजतापर्यंत सुरु राहणार असून सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने दररोज, तर इतर दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते दुपारी ४ वाजतापर्यंत सुरु राहणार आहेत.
राज्य सरकारने ठरवलेल्या निकषानुसार, गडचिरोली जिल्ह्याचा समावेश पातळी क्रमांक ३ मध्ये होत असून त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज आदेश जारी केला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून शहरात अत्यावश्यक सेवेसह काही सेवा सुरळीत आणि नियमित सुरु करण्यास परवानगी दिली आहे तर ग्रामीण भागात त्या सेवा ४ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
लातूरचा समावेश पहिल्या टप्प्यात झाला असल्याने याठिकाणीही सर्व प्रकारचे निर्बंध उठवायला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्व प्रकारची दुकानं, मॉल, रेस्टॉरंट, चित्रपट आणि नाट्यगृहं इथे नियमित वेळेनुसार सुरू राहू शकतील.
बीडचा समावेश तिसऱ्या श्रेणीत होत असल्याने याठिकाणी दुकानं संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली राहू शकतील. सरकारी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली असून सवलत मिळालेली खासगी कार्यालयं ४ वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
चित्रपटगृह, नाट्यगृह, मॉल मात्र बंदच राहतील. लग्नाला ५० तर अंत्यविधीला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा पहिल्या श्रेणीत असल्याने इथे सर्व प्रकारची दुकानं रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. मॉल, रेस्टॉरंट, चित्रपट आणि नाट्यगृह, जिम, सलून, पार्लर ५० टक्के क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहेत. लग्न आणि अंत्यविधीला केवळ ५० जणांचा उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यातही उद्यापासून बाजारपेठा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी ७ पूर्णांक ६७ शतांश टक्के असल्याने जिल्ह्यात अंशतः लॉकडाऊन राहणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मात्र येत्या ९ जूनपर्यंत कडक लॉकडाउन सुरूच राहणार असल्याचं जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज स्पष्ट केलं आहे.
राज्य शासनाच्या अनलॉकच्या नव्या निकषांनुसार रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. त्यामुळे काही प्रमाणात शिथिलता मिळण्याची शक्यता होती. मात्र जिल्ह्यातली करोनाची स्थिती लक्षात घेता गेल्या ३ जूनपासून जारी केलेले कडक लॉकडाउनचे नियम येत्या ९ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
ठरावीक वेळेत आणि निकषांनुसार अत्यावश्यक सेवा सुरू असून इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद आहेत.