नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं किमान आधारभूत किमतीनुसार सुरू केलेल्या गहू खरेदीचा लाभ आत्तापर्यंत १ कोटी २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी घेतला असून त्यांच्या खात्यात १ लाख ५४ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती ग्राहक कल्याण मंत्रालयानं दिली आहे.
आत्तापर्यंत केंद्र सरकारनं ४१८ लाख टनांहून अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच काळात ३६३ लाख टन गव्हाची खरेदी झाली होती. सध्याच्या रब्बी हंगामात या गहू खरेदीचा लाभ ४६ लाख शेतकऱ्यांनी घेतला आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये अद्याप गहू खरेदी सुरू असून इतर राज्यातून ८१६ लाख टन तांदळाची खरेदीही करण्यात आली आहे.