नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भविष्यात उद्भवणाऱ्या महामारींना थोपवण्यासाठी जागतिक एकता, नेतृत्व आणि सुसंवाद निर्माण करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते शनिवारी जी सेवन देशांच्या शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होताना बोलत होते. लोकशाही आणि पारदर्शक समाजांच्या विशेष जबाबदाऱ्यांच्या मुद्द्यावर देखील मोदी यांनी त्यावेळी भर दिला. या परिषदेतून “ एक पृथ्वी, एक आरोग्य “ हा संदेश संपूर्ण जगाकडे जाणं आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
सध्याच्या महामारीविरुद्ध त्यांनी भारताचा दृष्टीकोन मांडताना सांगितलं की सरकार, उद्योग आणि समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या स्तरावर समन्वय राखत प्रयत्न केले. त्याचबरोबर बाधित लोकांचा शोध तसच लसीकरण व्यवस्थापनासाठी भारतानं डिजिटल मीडियाच्या यशस्वीरित्या उपयोग केला असल्याचं सांगत भारत आपला अनुभव आणि कौशल्य इतर विकसनशील देशांशी सामायिक करण्यास तयार असल्याचं मोदी म्हणाले.