22 शिक्षण सेवकांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्ती पत्र

मुंबई : शिक्षण सेवक भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य शासनामार्फत पवित्र प्रणाली आणण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सेवक भरती करण्याचा हा उपक्रम अन्य राज्यांसाठीही पथदर्शी ठरेल, असे शालेय‍ शिक्षण व क्रीडा मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत पवित्र पोर्टलद्वारे निवड झालेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र वारभुवन उपस्थित होते. पवित्र प्रणालीदवारे भरती करण्यात आलेल्या 5 हजार 51 उमेदवारांपैकी 22 शिक्षण सेवकांना नियुक्तीपत्र प्रातिनिधीक स्वरुपात मंत्रालयात देण्यात आले.

ॲड. शेलार म्हणाले, राज्यातील शिक्षकांची भरती ही ऑनलाईन पद्धतीने पवित्र पेार्टलच्या माध्यमातून होणारी पहिलीच भरती आहे. या भरतीमुळे शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत होणारी अनियमितता दूर होण्यास मदत होणार आहे तसेच विद्यार्थ्यांना  गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे -विनोद तावडे

श्री. तावडे म्हणाले, आज नियुक्तीपत्र देण्यात आलेले सर्व शिक्षण सेवक पालघर येथे काम करणार असून इतर शिक्षण सेवकांनीही जेथे नियुक्तीचे ठिकाण मिळेल तेथे जावून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करावे. पवित्र प्रणालीमुळे पारदर्शक आणि कायदेशीर पध्दतीने शिक्षण सेवक भरती करण्यात आली आहे.

पवित्र प्रणालीमार्फत स्थानिक स्वराज्य संस्था व मुलाखतीशिवाय पद निवडीचा विकल्प दिलेल्या खाजगी संस्थांची यादी 9 ऑगस्ट 2019 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. मुलाखतीशिवाय 9 हजार 80 पदे भरतीसाठी उपलब्ध होती,त्यापैकी 5 हजार 822 पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली असून 3 हजार 258 पदे रिक्त राहिली आहेत. जिल्हा परिषदेत 3 हजार 530 तर महानगरपालिकेत 1 हजार 53 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. नगरपालिकांसाठी 172, खाजगी व्यवस्थापन (केवळ पहिली ते आठवी)296, खाजगी व्यवस्थापन (नववी ते बारावी) 771 असे एकूण 5 हजार 822 उमेदवार निवडण्यात आले आहेत. खाजगी व्यवस्थापनाच्या इयत्ता नववी ते बारावीसाठी उपलब्ध असलेले 771 उमेदवार वगळता इतर सर्व 5 हजार 51 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

काशिनाथ बोरसा, नरेश मोये, प्रवीण सांबर, संतोष भोये, ‍निलेश गावित,संजय भोये, जुली वळवी, मंजूळा शनवार, निता वरखंडे, रेणुका वरखंडे, योगेश वावरे, कृष्णा भोये, सुरेखा डोके, योगेश गावित, संतोष दयात, सोनल धोडी, लता पाटकर, शामू वाघात, सपना घरत, अमित खरपडे, सीमा झोडगे, रुपाली सावंत या शिक्षणसेवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

पवित्र पोर्टलविषयी थोडक्यात…

  • ‘पवित्र’ पोर्टल हे राज्य शासनाच्या शिक्षण विभागाशी संबंधित ऑनलाइन पोर्टल आहे. PAVITRA म्हणजेPortal For Visible to All Teachers Recruitment.
  • या पोर्टलमुळे शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यास मदत झाली आहे.
  • या पोर्टल मागचा हेतू प्रामुख्याने शिक्षक भरती प्रक्रियेत सर्व उमेदवारांना समान संधी देणे असा आहे.
  • पवित्र पोर्टलमुळे सर्व शिक्षकांची माहिती, सर्व संस्थांनी भरलेली शिक्षक पदे आणि रिक्त पदांची माहिती मिळणार आहे.