मुंबई : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले.
मंत्रालयात आज मोर्शी तालुक्यात मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
मोर्शी तालुक्यात शासकीय जागेत लवकरच मत्स्य विज्ञान महाविद्यालय सुरू होणार असून याबाबतची आवश्यक कार्यवाही लवकर करून जाहिरात प्रसिद्ध करावी. तसेच महाविद्यालयाच्या जागेची पाहणी करून आवश्यक ती डागडुजी व साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी यावेळी दिले.
यावेळी पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मत्स्य व्यवसाय आयुक्त राजीव जाधव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. पातुरकर, कुलसचिव चंद्रमान पराते व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अतुल गणपतराव जाधव यांचा सत्कार
दरम्यान, कृषी पर्यवेक्षक अतुल गणपतराव जाधव यांचा कृषीमंत्री डॉ. बोंडे यांनी सत्कार केला. कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे महापुरात अडकलेल्या लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी मोठे साहाय्य केले आहे. स्वतःच्या घरात पाणी साचून देखील कर्तव्यदक्षता दाखवून श्री. जाधव व त्यांच्या टीमने एनडीआरएफच्या टीमसोबत कोल्हापुरातील कुरूंदवाड गावातील 2500 लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले व त्याचबरोबर आर्मीच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जेवणाचे पॅकेट, बिस्कीटे, पाणी व औषधे पुरविण्याचे काम केले. यावेळी त्यांनी कुरूंदवाड, बहिरेवाडी, अहूरवाड, तेरवाड, राजापूर, राजापूरवाडी व शिरोळ येथील पूरग्रस्त लोकांना सहकार्य केले. त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असून पूरपरिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी धावून गेलेल्या सर्व कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार करणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी यावेळी सांगितले.