मुंबई : बचतगटातील महिलांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना ‘हिरकणी महाराष्ट्राची‘ योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर तालुकास्तरावरील 10 बचत गटांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येते. महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना सध्या 17 जिल्ह्यांत सुरु आहे.
जागतिक पातळीवर महिला उद्योजकांची संख्या वाढावी या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे. हिरकणी महाराष्ट्र योजनेंतर्गत महिलांच्या नव्या व्यवसाय निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यातील बचतगट सदस्यांच्या कल्पनांना कौशल्य विकास प्रशिक्षणातून प्रत्यक्षात साकारण्यासाठी सहाय्य केले जाते. प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर हिरकणी कॅम्पचे आयोजन करुन महिला उद्योजक, बचतगटातील महिलांना आर्थिक व्यासपीठ आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत आहे.