नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड महामारीतही अंतराळ विज्ञान, अणुऊर्जा, खाणकाम, अधिकोषण अशा विविध क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीतून भारतानं आपण परिस्थितीशी जुळवून घेत झपाट्यानं पुढे जाण्याचा मार्ग काढू शकतो हे जगाला दाखवून दिलं असल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. व्हिवा टेक या पॅरिस मध्ये दरवर्षी होणाऱ्या तंत्रज्ञानविषयक जागतिक परिषदेत काल प्रधानमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणाली मार्फत संबोधित केलं.
नवतेचा शोध घेणाऱ्यांना आणि गुंतवणुकदारांना पूरक वातावरण भारतात आहे. त्याचा लाभ घेत, भारतात गुंतवणूक करा असं आवाहन प्रधानामंत्र्यांनी आपल्या भाषणात केलं.
पारंपरिक ज्ञान तोकडं पडतं तेव्हा नवतेची कास धरावीच लागते. कोविड संकटानं आपल्या अनेक पारंपरिक कार्यपद्धतींची कसोटीच पाहिली. त्यावेळी नवनवीन संकल्पनाच आपल्या मदतीला धावून आल्या असं प्रधानमंत्री म्हणाले. अकीकृत तंत्रज्ञानामुळेच या काळात अनेकांचं जगणं सुकर झाल्याचं त्यांनी सांगितलं.
कोविड विरुद्धच्या लढ्याला भारतीय माहिती तंत्रज्ञानानं दिलेलं बळ लक्षणीय होतं. आरोग्य सेतू, कोविन पोर्टल या सारख्या अंकीकृत साधनांची बाधितांचा शोध आणि नागरिकांचं लसीकरण यासाठी मोठी मदत झाल्याचं ते म्हणाले.
आधार ओळखपत्रांमुळे गरजू लोकांपर्यंत शिधा पोहोचवण, इंधन पोहोचवणं शक्य झालं. स्वयम् आणि दीक्षा सारख्या अंकीकृत कार्यक्रमांनी शिक्षण थांबू दिलं नाही.
गेल्या वर्षभरात अडथळे अनेक आले पण आम्ही थांबलो नाही असं मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.