मुंबई (वृत्तसंस्था) : जालना जिल्ह्यातल्या अंबड, भोकरदन तालुक्यातल्या काल झालेल्या पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पारध इथल्या रायघोळ नदीला मोठा पूर आला होता. अवघराव सावंगी इथं नदी ओलांडत असताना दोन भाऊ पुराच्या पाण्यात वाहून गेले. यातल्या एकाला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात रात्रभर पाऊस पडल्यानं बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शीरले आहे.
नांदेड जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असून जमीनीत पाणी झिरपण्यास या पावसामुळे मदत होणार आहे.
परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून कराड तालुक्यात शिवडे इथल्या सहयोग विलगीकरण कक्षाच्या आवारात उत्तर मांड नदीचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे २९ कोरोना रुग्ण विलगीकरण कक्षात अडकले असून रुग्णांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी नदीला पूर आला असून या नदीने सहा मीटरची धोक्याची पातळी ओलांडली आहे.
चिपळूण तालुक्यात वाशिष्ठी नदीलाही पूर आला आहे. राजापूर तालुक्यात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आल्यामुळे राजापूर शहरात पुराचं पाणी शिरण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीजवळ निवळी घाटात काल मध्यरात्री दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक बंद पडली होती. आज सकाळपासून ही वाहतूक पूर्ववत सुरू झाली. काजळी नदीलाही पूर आला असून रत्नागिरी तालुक्याच्या सोमेश्वर चांदेराई भागात पुराचं पाणी आलं आहे.