पिंपरी : देशातील महिलांना, दिनदुबळ्यांना, बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, तळागाळातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रातील जूलमी, अन्यायकारक मोदींचे सरकार घालवणे हाच देशातील कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

अखिल भारतीय कॉंग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी (दि. 19 जून) आकुर्डी येथिल तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी साठे बोलत होते. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, महिला कॉंग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, ब्लॉक अध्यक्ष विष्णूपंत नेवाळे, प्रदेश अल्पसंख्यांक पदाधिकारी राजेंद्रसिंह वालिया, युवक प्रदेश सरचिटणीस मयूर जयस्वाल, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, सज्जी वर्की, चंद्रशेखर जाधव, मकरध्वज यादव, अक्षय शहरकर, लक्ष्मण रुपनर, विश्वनाथ खंडाळे, हिरामण खवळे, विशाल कसबे, वसिम शेख, सुभाष भुषणे, अक्षय शहरकर, अण्णासाहेब कसबे, रोहित भाट, शोभा पगारे, विवेक भाट, व्ही. कबीर, सुनिल राऊत आदी उपस्थित होते. यावेळी पांडुरंग जगताप, भास्कर नारखेडे, बाजीराव आल्हाट, सुभाष भुसणे, गुंगा क्षीरसागर यांना शहर कार्यकारणीवर निवड झाल्याचे पत्र शहराध्यक्ष साठे यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी सचिन साठे म्हणाले की, केंद्रातील सरकारने मागील सात वर्षात अनागोंदी कारभार केला आहे. याविरुध्द राहुल गांधी लढत आहेत. शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, दिनदुबळ्यांवरील अन्याय थांबले पाहिजेत, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी काश्मिरपासून कन्याकुमारी पर्यंत कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे की, हे केंद्रातील सरकार घालविलेच पाहिजे. कॉंग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केलं असे विचारण्याचा नैतिक अधिकारच मोदींना आणि भाजपाला नाही. सत्तर वर्षात जे कॉंग्रेसने उभे केलं ते भांडवलदारांना विकण्याचा उद्योग केंद्र सरकार करत आहे. एअर इंडीया, पेट्रोलियम कंपन्या, एलआयसी सारखी वीमा कंपनी आणि आता संरक्षण क्षेत्रासाठी दारुगोळा उत्पादन करणारे कारखाने भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. संरक्षण क्षेत्रातील खासगीकरणामुळे देशाची संरक्षण व्यवस्थाच धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. हे होऊ नये यासाठी सर्व देशवासीयांनी रस्त्यावर उतरुन सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला पाहिजे. आपला देश सुरक्षित राहण्यासाठी संरक्षण खात्यातील खासगीकरण थांबवले पाहिजे. यासाठी हा लढा तीव्रपणे उभा करण्याची वेळ आली आहे असेही पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यावेळी म्हणाले.