पुणे : भारतीय जनता पक्षाचे गिरीश बापट यांनी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांचा तब्बल ३,२४,९६५ इतक्या मोठय़ा मताधिक्याने पराभव करत पुणे लोकसभा मतदार संघातून ऐतिहासिक विजय मिळविला. पुणे लोकसभेच्या इतिहासातील सर्वाधिक मताधिक्य बापट यांना मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल शिरोळे यांनी तीन लाख १५ हजार ७६९ मतांची आघाडी घेत विक्रम केला होता. मात्र शिरोळे यांच्यापेक्षाही अधिक मताधिक्य घेतल्यामुळे गिरीश बापट यांचा विजय ऐतिहासिक ठरला आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदान कमी झाल्यामुळे बापट यांना किती मताधिक्य मिळणार, याबाबतच उत्सुकता होती.

मात्र मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर गिरीश बापट आणि मोहन जोशी यांच्यातील लढत पहिल्या फेरीपासूनच एकतर्फी राहिली. पहिल्या फेरीतच गिरीश बापट यांनी १५ हजार ७७२ मतांची आघाडी घेतली. ही आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.

कसबा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर या मतदार संघांबरोबरच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघातही बापट यांना मोहन जोशी यांच्यापेक्षा अधिक मते मिळाली. बापट यांनी पहिल्या तीन फेऱ्यांत घेतलेली आघाडी वाढत राहिली. दहा फेऱ्यांनंतर बापट यांच्या मतांच्या आघाडीने लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर बापट यांच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब झाले. १९ व्या फेरीपर्यंत बापट २ लाख ८९ हजार ३२५ मतांनी आघाडीवर होते.

सर्व सहा विधानसभा मतदार संघांत गिरीश बापट यांना मोठे मताधिक्य मिळाले. त्यातही बापट प्रतिनिधित्व करत असलेल्या कसबा मतदार संघासह पर्वती आणि कोथरूड मतदार संघातून बापट यांना मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. त्यामुळे शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत बापट यांचे मताधिक्य ३ लाखांच्या पुढे पोहोचले. मतमोजणीच्या २१ व्या फेरीमध्ये बापट यांचे मताधिक्य तीन लाख २० हजार २५९ एवढे झाले होते. या फेरीअखेर नोटाचा पर्याय वापरणाऱ्यांची संख्या १० हजार ८०९ होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विजयाचे श्रेय जाते. हा विजय एकटय़ा व्यक्तीचा नसून पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. पक्षाने केलेल्या कामाची ही पावती आहे. गेली अनेक वर्षे शहराच्या ज्या विकासाची स्वप्न आम्ही पाहत होतो, ती साकार करण्याची वेळ आता आली आहे.असे मनोगत भाजपाचे विजयी उमेदवार गिरीश बापट यांनी केले.