भाजप नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असंख्य महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करतात. त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने पाळणाघर सुरू करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात पाळणाघर सुरु करावेत, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी केली आहे.
 
नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. यावेळी क्रीडा समिती सभापाती तुषार हिंगे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, नगरसेवक संदीप वाघेरे हे उपस्थित होते. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महिला नागरिक या नोकरी, व्यवसाय  या निमित्ताने घराबाहेर असतात. त्यांचे बालकांना या कलावधीत संभाळण्यामाठी विशेष अशी सोय नसते. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, आय.टी., एम.आय.डी.सी. व खाजगी कंपनी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या भरपुर असून, त्यांचे लहान बालकांना पाळणाघराची सुविधा देणे आवश्यक आहे.
 

पिंपरी चिंचवड महानरपालिकेकडून गरोदर व प्रसुती झालेल्या महिलांना जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना यासारख्या योजनांचा लाभ दिला जात आहे. परंतु, पुणे महानगरपालिकेमार्फत अशा महिला कर्मचारी यांचे बालकांसाठी पाळणाघर चालू करुन ते माफक दरात चालविले जातात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत महिला व बालकल्याण समिती आहे. त्या माध्यमाततून महिला व मुलांसाठी काम होणे अपेक्षित आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील विविध भागांमध्ये पाळणाघर सुरु करावे, असे नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांनी या निवेदनात म्हटले आहे.