नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल दिवसभरात ५८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ४६ हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली.
आत्तापर्यंत देशभरातले २ कोटी ९३ लाखापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याबरोबरच देशाचा कोरोना मुक्तीदर वाढून ९६ पूर्णांक ८ दशांश टक्क्यावर पोचला आहे. देशात काल दिवसभरात ९७९ रुग्ण कोरोनामुळे दगावले. यामुळे कोरोना बळींची एकूण संख्या ३ लाख ९६ हजारापेक्षा अधिक झाली आहे.
सध्या देशभरात ५ लाख ७२ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं नवा पल्ला गाठत, एकूण लसीकरण संख्येच्या बाबतीत अमेरिकेला पीछाडीवर सोडलं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. आत्तापर्यंत देशात ३२ कोटी ३६ लाखाहून अधिक नागरिकांना लस दिली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कळवलं आहे.