महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून मुक्त आणि नि:पक्षपातीपणा, निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या कोणाचाही मुलाहिजा न बाळगणे, शांततेची काटेकोर अंमलबजावणी, सर्वसमावेशकता, सुलभ संपर्क, उमेदवार आणि प्रक्रियेतील घटकांकडून नितीमूल्यांची जपणूक आणि मतदार, सर्व समाजघटक तसेच राजकीय पक्षांचा सक्रीय सहभाग या सप्तसूत्रीला समोर ठेऊन काम करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी केले.

राज्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी श्री. सिन्हा यांच्यासह निवडणूक आयोगाचे अन्य उपनिवडणूक आयुक्त संदीप सक्सेना, सुदीप जैन, चंद्र भूषण कुमार, महासंचालक दिलीप शर्मा, धीरेंद्र ओझा मुंबईत आलेले आहेत. त्यांनी मुख्य सचिव यांच्या दालनात मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आढावा घेतला आणि सूचना दिल्या.

महाराष्ट्रात अत्यंत शांततापूर्ण निवडणुका पार पडतात, असे प्रारंभीच सांगून श्री. सिन्हा म्हणाले की, राज्याला शांततेचा इतिहास असला तरी संपूर्ण सावधानता बाळगून सर्व तयारीनिशी निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हास्तर ते अगदी मतदान केंद्रस्तरापर्यंतचा उत्कृष्ट निवडणूक आराखडा तयार करावा. सर्व मतदान केंद्रे सर्वसामान्य मतदार ते ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगस्नेही असतील याची काळजी घ्यावी. तेथे पाणी, वीज, शौचालय आदी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. मतदानकेंद्रे रांगविरहीत असतील यादृष्टीने नियोजन करावे.

त्यांनी पुढे सांगितले, अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असल्या तरी मतदार जागृती कार्यक्रम (स्वीप) प्रभावीपणे राबवून मतदार नोंदणीची प्रक्रिया गतिमान करावी. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. मतदारांच्या वगळलेल्या नावांची पुन्हा पडताळणी करावी आणि चुकीच्या पद्धतीने नावे वगळल्याचे आढळल्यास त्याबाबत पुनर्विचार करून दुरुस्ती करावी. या प्रक्रियेत सर्व राजकीय पक्षांना माहिती देऊन त्याबाबतच्या सर्व शंकांचे निरसन करावे.

निवडणूक मतदार केंद्रित राहील याकडे लक्ष द्यावे, आदर्श मतदान केंद्रे स्थापन करावीत, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी करावी, पोलीस विभागाने बंदोबस्तासाठी पुरेशा मनुष्यबळाची तरतूद करावी, मतदार जागृतीसाठी स्वयंसेवी संस्था, एनएसएस, शाळा, महाविद्यालये आदींचे सहकार्य घेण्यात यावे, दिव्यांग, वृद्ध मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठीही या संस्थांचे सहकार्य घेता येईल.

निवडणूक प्रक्रियेत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या संख्येत अधिकाधिक वाढ करण्यात यावी, उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि अवैध पैशाचा वापर याबाबत काटेकोर पर्यवेक्षण करण्यात यावे. पैशाच्या वापरावर आळा घालण्यासाठी अंतर्गत माहिती यंत्रणा सक्षम करून अशा प्रकरणात तत्काळ छापे आणि जप्तीसारखी कारवाई करावी, जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समित्यांनी जबाबदारीने भूमिका बजावावी.

सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या मजकुराचे विशेष पर्यवेक्षण करावे. माध्यमांना वेळोवेळी निवडणूक प्रक्रियेची माहिती द्यावी, 1950 या मतदार मदत क्रमांकावरून नागरिकांच्या समस्या समजून निराकरण करावे आदी सूचनाही यावेळी निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या.

यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, मुंबईचे सहपोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आदी उपस्थित होते.

दरम्यान मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती वाहनाचे वरिष्ठ उपनिवडणूक अधिकारी उमेश सिन्हा आणि अन्य उपनिवडणूक आयुक्त यांच्या हस्ते मंत्रालय येथे उद्घाटन करण्यात आहे.