नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुगल, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे प्रसिद्ध समाज माध्यम मंच नव्या माहिती तंत्रज्ञान नियमावलीचं पालन करत असल्याचं दिसत असून ही समाधानकारक बाब असल्याचं माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नव्या आयटी नियमानुसार या मंचावरील आक्षेपार्ह पोस्ट स्वयंस्फूर्तीनं काढून टाकल्या जात असल्याचं पहिल्या अनुपालन अहवालातून निष्पन्न झालं असून हे पारदर्शकेच्या दिशेनं मोठं पाऊल आहे, असं प्रसाद यांनी त्यांच्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. फेसबुकनं काल पहिला अनुपालन अहवाल प्रसिद्ध केला. नियमांच्या उल्लंघनांच्या १० मुख्य प्रकारांखाली १५ मे ते १५ जून या कालावधीत ३० दशलक्ष कंटेन्ट्सवर कारवाई करण्यात आल्याचं फेसबुकनं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामनं वीस लाख कंटेन्ट्सवर कारवाई केली आहे. गुगल आणि कू अॅपनंही त्यांचे अनुपालन अहवाल प्रकाशित केले आहेत. नव्या आयटी नियमांनुसार विशिष्ट कालावधीनंतर हा अहवाल प्रकाशित करणं बंधनकारक आहे.