नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमध्ये पुराचं संकट तीव्र होत असून पुराचं पाणी रस्ते आणि रेल्वे रुळांवर शिरल्यानं सकाळपासून रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. सुगौली रेल्वे स्थानकावर पाणी साठल्यानं मुझफ्फरपूर-नरकटीयागंज दरम्यानची वाहतूक थांबविण्यात आली आहे. रक्सौल-मुझफ्फरपूर एक्स्प्रेस आणि मंडूआडिह-मुझफ्फरपूर एक्सप्रेससह सहा रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गंडक नदीच्या पाण्याची पातळी सातत्यानं वाढत असून या नदीवर रेल्वेचे २४८ पूल असल्यानं संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अरेरिया-किशनगंज दरम्यानची रस्ते वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. सीतामढी, शिवहर, पूर्व आणि पश्चिम चम्पारण या जिल्ह्यातील वाहतूकही वाढत्या पाणी पातळीमुळे विस्कळीत झाली आहे.