मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. मात्र या प्रतिविधानसभेविरोधात महाविकास आघाडीतील आमदारांनी कारवाईची मागणी केली आहे. भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला.

प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का? तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उपस्थित केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिविधानसभा भरवणं हा सभागृहाचा अपमान असून हा सर्व काय प्रकार सुरु आहे असा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला. तसंच हे प्रतिविधानसभा भरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे असं मत व्यक्त करतानाच ही प्रतिविधानसभा सुरु राहणार असेल तर आपण आपलं कामकाज बंद करुयात, अशा शब्दांमध्ये चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

कारवाई होणार असेल तर तोपर्यंत सभागृहाचं कामकाज थांबवण्याचं मतही चव्हाण यांनी नोंदवलं. त्याचप्रमाणे एका वृत्तवाहिनीवर सुरु असणारं प्रतिविधानसभेचं लाइव्ह प्रक्षेपण थांबवण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. या प्रतिविधानसभेसमोर कॅमेरा आणि सर्व यंत्रणा असून त्याचं लाइव्ह प्रक्षेपण केलं जात असल्याचा मुद्दा मांडत चव्हाण यांनी या थेट प्रक्षेपणावरही आक्षेप घेतला.

विधिमंडळाच्या आवारात भरवण्यात आलेल्या या प्रतिविधानसभेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले. दरम्यान, सभागृहात कोणतीही चर्चा न होता २३ हजार एकशे ४५ कोटी ७५ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत.