मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. नागपूरमध्ये भाजपातर्फे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा नेतृत्वात भाजप आमदार, आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सह विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या पुतळा जाळून सरकारच्या विरोधात  निदर्शनं केली.

विधानसभेत ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डाटा केंद्रानं द्यावा यासाठी सरकारतर्फे मांडलेला ठरावच  घटनाविरोधी, सर्वोच न्यायालयाच्या विरोधात असल्याचा आरोप भाजपातर्फे करण्यात आला, ओबीसीचं राजकीय आरक्षण नाकारण्यामागे राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत,१२ आमदारांचं निलंबन म्हणजे ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही भाजप तर्फे करण्यात आला आहे.

गडचिरोलीमध्ये पूर्व केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपं ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहिर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय आधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. हे निलंबन सूडबुध्दीनं केलं असून लोकशाहीची हत्या आणि व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.