नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करी अभियंता सेवेच्या अधिकाऱ्यांनी भविष्यातल्या प्रकल्पांमध्ये मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.  राष्ट्रपती भवनात लष्करी अभियंता सेवेच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना राष्ट्रपती आज बोलत होत्या.

बांधकाम क्षेत्र अतिशय गतिमान असून तंत्रज्ञान खूप वेगानं बदलत आहे. आर्थिक वाढ आणि विकासात हे क्षेत्र मोठी भूमिका बजावत आहे, असं राष्ट्रपति म्हणाल्या. लष्करी अभियंता सेवेचे अधिकारी,प्रकल्प व्यवस्थापनाच्या आधुनिक साधनांचा वापर करून पायाभूत सुविधा विकासात मोठं योगदान देऊ शकतात, असं त्यांनी अधोरेखित केलं.

सर्व संरक्षण शस्त्रास्त्रं आणि इतर संस्थांना रियर लाइन इंजिनीअरिंग सपोर्ट प्रदान करण्यात अधिकारी मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.