पुणे : महाराष्ट्र शासनाच्या अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारीपासून पुणे मुख्यालयी सुरु झाली आहे. या योजनेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. गरीब व गरजू जनतेला सवलतीमध्ये भोजन मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. श्री मुंजाजी मारोतराव भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देत या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चेतन तुपे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. हडपसर गाडीतळ- शिवसमर्थ भोजनालय, कात्रज बसस्थानक- कात्रज केंद्र, स्वारगेट बसस्थानक- स्वारगेट बसस्थानक कँटीन, मार्केटयार्ड गुलटेकडी- हॉटेल समाधान गाळा नं 11, कौटुंबिक न्यायालय शिवाजीनगर- कौटुंबिक न्यायालय कॅटीन, महानगरपालिका भवन- हॉटेल निशिगंधा, पिंपरी चिंचवड महानगर पालिका- कॅटीन, महात्मा फुले मंडई- अनिल स्नॅक्स सेंटर, यशवंतराव चव्हाण रूग्णालय पिंपरी- कॅटीन, वल्लभनगर बसस्थानक पिंपरी- कॅटीन, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण- कॅटीन या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासन या योजनेसाठी प्रत्येक जेवणाच्या थाळीसाठी शहरी भागामध्ये रुपये 50 तर ग्रामीण भागामध्ये रुपये 35 असे दर कंत्राटदारांना देणार आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांकडून केवळ 10 रुपये रक्कम घेतली जात असली तरी सदर थाळीची किंमत ही शहरी भागांमध्ये 50 रुपये व ग्रामीण भागामध्ये 35 रुपये असणार आहे. दहा रुपये वगळता अन्य रक्कम ही अनुदान असणार आहे. त्यामुळे या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रात 7 ठिकाणी एक हजार थाळी व पिंपरी चिंचवड महानगर पालिका 4 ठिकाणी 500 थाळीचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा’ हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भोजनालयातून दुपारी बारा ते दोन या कालावधीतच शिव भोजन थाळी मिळणार आहे.