मुंबई : टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मीराबाई चानू यांचं कौतुक केलं.

2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण असल्यांचही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. भारतीय हॉकी संघानं आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.