मुंबई : जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते आपल्या राज्य मंत्रिमंडळात असून ही एक “बेस्ट टीम” आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्या वहिल्या मंत्री परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सर्व मंत्री व राज्यमंत्री उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या मंत्री परिषदेला सर्व मंत्री व राज्य मंत्री उपस्थित होते.

प्रारंभी सर्वांचे स्वागत करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, याठिकाणी भिन्न भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आले असले तरी आपण जनतेतून निवडून आलेलो असल्याने त्यांचे प्रश्न सोडविणे यावर सगळे एक आहोत. एक कुटुंब म्हणून याठिकाणी आपणांस काम करायचे असून एखाद्या विषयावर वेगवेगळी भूमिका जरी असली तरी राज्यासाठी हिताचे काय त्याचाच विचार आपल्याला करायचा आहे. आपली ही बेस्ट टीम प्रत्येक सामना जिंकेलच आणि राज्याला अधिक प्रगतीपथावर पोहोचवेल असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

8 तारखेस विशेष अधिवेशन

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मधील अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 8 जानेवारी 2020 रोजी बोलवावे असेही मंत्री परिषद बैठकीत ठरले.