मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या घटली असली तरी कोरोनाच्या संभाव्य़ तिस-या लाटेचा धोका लक्षात घेवून मुंबई महापालिकेडून आणखी दहा हजार खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय नवीन कोविड सेंटरही उभी केली जात आहेत. कांजूर मार्ग इथे सिडकोच्या सहकार्यानं १ हजार ७०० खाटांचं जम्बो कोवीड केअर सेंटर उभारलं जात असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईतले निर्बंध कमी करण्यासाठीचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे, असंही काकाणी यांनी सांगितलं.

मुंबईत काल ३८२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख ११ हजार ६९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  काल ४०४ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आतापर्यंत रुग्णांची संख्या  ७ लाख ३५ हजार १६५ झाली असून,मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार ३८३ दिवसांवर आलाय. सध्या ५ हजार २८० रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ६ जणांचा  मृत्यू असून, एकूण  मृतांचा आकडा १५ हजार ७९५ वर पोहचला आहे.