मुंबई : निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या कोविड मुक्तीचा मार्ग या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेले दीड-पावणेदोन वर्षांपासून आपण सर्वजण कोविडचा मुकाबला करतो आहोत. या सगळ्या प्रवासात आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिले, वेगवेगळी आव्हाने स्वीकारली, अनेक पावले उचलली. आज दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची पण शक्यता आहे, अशा वेळी आपल्या सर्व अनुभवांचे संकलन आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण या संकटाचा मुकाबला कसा केला त्या विषयी विस्तृत माहिती मिळू शकेल.
कोविडच्या विषाणूमध्ये देखील उत्परिवर्तन होत आहे, आणि या विषाणूंच्या नवीन नवीन अवतारामुळे जगामध्ये आव्हाने उभी राहिली आहेत. आज आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये देखील परत एकदा संसर्ग वाढताना दिसतो आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे लागेल आणि आरोग्याच्य्l नियमांचे चांगले पालन देखील करावे लागणार आहे.
या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कोरोनाविषयक कामासाठी पुढील चांगली दिशा मिळेल अशी आशा देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
सेवानिवृत्तीनंतर देखील स्वस्थ न बसता राज्य शासनाला या कोरोना संकटांमध्ये मदत करण्याच्या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या वृत्तीचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.
प्रारंभी डॉ. म्हैसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कोविड मुक्तीचा मार्ग हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगितला.