नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या हॉकी संघानं काल ऐतिहासिक विजयाची नोंद करत गेल्या चार दशकांमध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
काल संध्याकाळी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत भारतानं ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव केला. भारताच्या वतीनं दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. विशेष म्हणजे हे तीनही गोल मैदानी गोल होते.
ग्रेट ब्रिटनच्या वतीनं सामन्याच्या ४५व्या मिनीटाला सॅम वार्ड यानं एकमेव गोल केला. आता उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जिअमसोबत होणार आहे.
महिला हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीतही आज भारताच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करून, पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या गुरजीत कौरनं २२ व्या मिनीटाला केलेला गोल सामन्यातला एकमेव गोल ठरला.
या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. मात्र भारताच्या अभेद्य बचावामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरोधात एकही गोल करता आला नाही. भारताच्या महिला हॉकी संघानं १९८० आणि २०१६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. यात १९८० साली चौथ्या क्रमांवर राहात भारतानं आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती.
भारताच्या आजच्या ऐतिसाहिक कामगिरीबद्दल क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय महिला हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे. भारताचा संघ या ऑलिम्पिक स्पर्धेत नवा इतिहास रचत आहे, या संघाला सर्व भारतीयांच्या शुभेच्छा असल्याचं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
भारताची धावपटू दुती चंद हिनं महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत २३ पूर्णांक ८५ सेकंद वेळ नोंदवत, या हंगामातली स्वतःची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली, मात्र शेवटच्या स्थानावर राहिल्यानं ती उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही.
नेमबाजीतही भारताच्या ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि संजीव राजपूत ५० मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारासाठीच्या पात्रता फेरीतच बाद झाले. महिलांच्या थाळेफेकीत आज भारताची कमलप्रित कौर सहभागी होणार आहे.
संध्याकाळी साडेचार वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. भारताला तिच्याकडून पदकाच्या मोठ्या आशा आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पदक तालिकेत भारत एक रौप्य आणि एका कांस्य पदकासह ६१व्या स्थानवर आहे.
तर २४ सुवर्णपदकांसह चीन पहिल्या, २० सुवर्णपदकांसह अमेरिका दुसऱ्या आणि १७ सुवर्णपदकांसह यजमान जपान तिसऱ्या स्थानावर आहेत. काल महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिकेलेली पी.व्ही सिंधू हीच आज सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन करण्यात आलं.