मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या भूस्खलनाची शक्यता असलेल्या १०९ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून पुण्याच्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून या भागांचं सर्वेक्षण केलं जाणार आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड तालुक्यात दरड कोसळून, तर इतर काही ठिकाणी जमीन खचल्यानं २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलं होतं. भविष्यात अशा तऱ्हेनं प्राणहानी होऊ नये, यासाठी जमीन खचण्याची किंवा दरड कोसळण्याची शक्यता असलेली १०९ ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातल्या सर्व नऊ तालुक्यांमध्ये अशी ठिकाणं असून सर्वाधिक २५ ठिकाणं खेड तालुक्यात आहेत असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.