मुंबई (वृत्तसंस्था) : अकरावी प्रवेशाची प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे कुठल्याही शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे सर्व शिक्षण मंडळांनी निकाल जाहीर केले होते. मात्र सर्वच शिक्षण मंडळाचे अभ्यासक्रम, मूल्यांकन पद्धती एकसमान नसल्यानं प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला होता. सर्व परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देता येणार होती. वैकल्पिक असलेल्या या परीक्षेसाठी सरकारनं २८ मे रोजी शासन आदेश काढला होता. मात्र त्याला ICSE बोर्डाच्या एका विद्यार्थ्यानं आव्हान दिलं होतं. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. प्रवेश परीक्षेमूळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता. त्यामुळे परीक्षा रद्द करणे आवश्यक असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सध्याच्या मूल्यांकनावरच प्रवेश द्यावे तसेच ११ वी प्रवेश प्रक्रिया ६ आठवड्यात पूर्ण करावे असे आदेशही न्यायालयानं दिले.