नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या २४ तासात २८ हजार २०४ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. गेल्या १४७ दिवसात दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच ही संख्या ३० हजारांच्या खाली आली आहे. काल ३७३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे देशात आत्तापर्यंत एकंदर ४ लाख २८ हजार ६८२ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.देशभरात काल ४१ हजार ५११ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले. त्यामुळे देशात आत्तापर्यंत एकंदर ३ कोटी ११ लाख  ८० हजार ९६८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा देशाचा दर ९७ पूर्णांक ४५ शतांश टक्के झाला आहे. देशात काल दिवसभरात १५ लाख ११ हजार ३१३  कोरोना  चाचण्या करण्यात आल्या. देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ८८ हजार ५०८ झाली आहे. ही गेल्या १३९ दिवसातील नीचांकी उपचाराधीन रुग्ण संख्या आहे. एकंदर रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्ण संख्येचा दर १ पूर्णांक २१ दशांश टक्के झाला आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत एकंदर ५१ कोटी ४५ लाख २६८  लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात गेल्या २४ तासात ५४ लाख ९१ हजार ६४७ जणांना कोविड-१९ प्रतिबंधक लसीची मात्रा देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.