मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. यापूर्वी ज्या टप्प्यावर निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती तिथून पुढे सुरू करण्यासंदर्भातला आदेश काल राज्य सरकारच्या सहकार विभागाने प्रसिद्ध केला आहे. यामुळे संचालक मंडळाची मुदत पूर्ण झालेल्या सहकारी बँकांमधली निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. राज्यातल्या कोरोना परिस्थितीमुळे ६ एप्रिल रोजी राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्ट पर्यंत स्थगित केल्या होत्या. आता ही स्थगिती उठवल्यामुळं मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू व्हायला मदत होणार आहे.