मुंबई (वृत्तसंस्था) : छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात येत्या तीन ते चार दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याविषयी हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी अधिक माहिती दिली.मुंबईत आज सकाळपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे नोकरी व्यवसायानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या सरी बरसत आहेत.महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ठाणे, कल्याण, रायगड परिसर रायगड आणि मुंबईच्या किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आहे.अतिवृष्टीचा इशारा असल्यानं रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जनतेनंही सतर्क राहावं असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अतिवृष्टीनंतर दरडी कोसळण्याची आणि महापुराची शक्यता गृहित धरून काय उपाययोजना करता येतील याचा आढावाही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अधिकार्यांयनी सतर्कता बाळगावी आणि मुख्यालय सोडू नये असे आदेश जिल्हाधिकार्यांयनी दिले आहेत. दरम्यान आज सकाळपासूनच आभाळ भरून आलं असून सकाळी पावसाची एक मोठी सर देखील येऊन गेली आहे.उस्मानाबाद शहरासह परिसरात आणि तुळजापूर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार आहे. सूर्यदर्शनही झाले नाही. या पावसाचा खरीप पिकांना उपयोग होईल. मात्र पाणीसाठा वाढण्यासाठी मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. सोयाबीन सह अनेक पिकांना या पावसाचा लाभ होणार असून काढणीच्या टप्प्यात असलेल्या उडीद मुगाला याचा फटका बसणार आहे.