नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युवकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होण्याची गरज असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्राचा वृत्त विभाग येत्या तीन सप्टेंबरपासून, आजादी का अमृत महोत्सव व्याख्यानमाला सुरू करत आहे. या व्याख्यानमालेचं उद्घाटन आज कराड यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतात विविधता असली तरी राष्ट्रप्रेम आपल्याला एक ठेवतं, असं ते म्हणाले. पद्मविभूषण, पद्मभूषण पुरस्कार देताना तळागाळातल्या नागरिकांचा सरकार विचार करतं, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना न्याय देण्याचं काम मोदी सरकार करत असल्याचं, त्यांनी सांगितलं. खासदार सय्यद इम्तियाज जलीलही यावेळी उपस्थित होते. जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतात जास्त एकता असल्याचं जलील यावेळी म्हणाले. इंग्रजांचं देशात आगमन झाल्यापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत, स्वातंत्र्य चळवळीचा संपूर्ण इतिहास, शंभर भागांच्या या व्याख्यानमालेतून, दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी प्रसारित होणार आहे.दरम्यान, औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या वृत्तविभागाला परवा एक सप्टेंबर रोजी ४१ वर्ष पूर्ण होत आहेत, यानिमित्त काढलेल्या ‘अवलोकन चाळीशीचे’ या ई-पुस्तकाचं प्रकाशनही, कराड आणि जलिल यांच्या हस्ते आज झालं. गेल्या ४० वर्षांत आकाशवाणीच्या वृत्त विभागात कार्य केलेल्या लोकांनी सांगितलेल्या आठवणी, या ई-पुस्तकात संकलित केल्या आहेत.